किल्लारी भूकंपाची २५ वर्षे - शांतिलाल मुथ्था

img

प्राथमिक तयारी :

३० सप्टेंबर २०१८ रोजी किल्लारी भूकंपाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आजही भूकंपाची संपूर्ण दृश्ये डोळ्यासमोर उभी राहतात. ज्या दिवशी पहाटे २.०० वाजता भूकंप झाला त्या दिवशी सकाळी ७.३० वाजता आमचे उस्मानाबाद येथील कार्यकर्ते श्री. विजय बेदमुथ्था, औरंगाबाद येथील श्री. जी. एम. बोथरा या दोघांनी प्रलयंकारी भूकंपाची सर्वप्रथम मला माहिती दिली. मी पुण्यातच होतो. बीजेएस त्याच्या आधी आठ वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत होती. मी संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळी पायी फिरलो होतो. नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रात तोपर्यंत मी कोणतेही कार्य केलेले नव्हते. परंतु जसा मला या दोन कार्यकर्त्यांचा फोन आला, मी खूप अस्वस्थ झालो.

ही बातमी काही मिनिटांतच वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मला त्यावेळी १-२ तास काही सुचलेच नाही. शेवटी मी ठरविले की आपल्याला या भूकंपात मोठ्याप्रमाणावर काम करावयाचे आहे. आपल्या राज्यातील जनता जर भूकंपाने त्रस्त असेल तर आपण स्वस्थ बसून चालणार नाही. काय केले पाहिजे याचा विचार करीत असताना आमचे बार्शी येथील कार्यकर्ते श्री. ओमप्रकाश बाफना व बीड येथील श्री. नितीन कोटेचा यांना फोन करून ताबडतोब काही साहित्य, फळे, पुरीभाजी भूकंपग्रस्त भागात पाठविण्यासाठी विनंती केली. मी स्वतः ४०-५० कार्यकर्त्यांसह रात्री भूकंपग्रस्त भागात जाण्याचा निर्णय घेतला. परंतु आपण बरोबर काय घेऊन जावे, याबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करीत असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. उदा. या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्या ठिकाणी जनरेटर घेऊन गेले पाहिजे. त्यासाठी पुण्यातील माझ्या बांधकाम व्यवसायातील मित्रांतर्फे जनरेटर गोळा करण्याची तयारी केली. भूकंपग्रस्त भागात जाऊन राहायचे असेल तर त्या ठिकाणी तंबू बनवावे लागतील, त्यासाठी सोलापूर येथून ताडपत्री घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या भागात आपले मदतकेंद्र कुठे असावे, यासाठी श्री. विजय बेदमुथ्था यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांना दौरा करण्याची विनंती केली. त्यांनी दिवसभर दौरा करून सास्तूर येथे अखिल महाराष्ट्रीय जैन संघटनेचे मदतकेंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. लातूर-उस्मानाबादच्या आसपासची मोठी गावे उदा. बीड, औरंगाबाद, बार्शी, सोलापूर येथील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदतकार्यासाठी तयार राहण्याची विनंती केली.

लातूर-उस्मानाबाद दौरा प्रारंभ :

त्यावेळी आमदार श्री. मदन बाफना यांना आमच्याबरोबर येण्याची विनंती केली व मी संध्याकाळी त्यांचेबरोबर बार्शीकडे निघालो. धो-धो पाऊस पाडत होता, त्यामुळे गाडी अतिशय हळू घ्यावी लागत होती, समोरचे काहीच दिसत नव्हते. टेंभूर्णीजवळ आम्ही पोहचलो तोच आमच्या गाडीवर वीज कोसळली. गाडीची मागील काच फुटल्यामुळे पावसाचे पाणी आतमध्ये येत होते. गाडीच्या टायरचे अर्थिंग असल्यामुळे आपल्याला कोणतीही इजा पोहचली नाही, असे श्री. मदन बाफना म्हणाले.

बार्शीला आम्ही पोहचलो. श्री. ओमप्रकाश बाफना यांनी साहित्याचा ट्रक पाठवला होता. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली व त्यांना ४-५ दिवसांच्या कामाचे वाटप करण्यात आले. तेथून आम्ही दोन घास खाऊन उस्मानाबाद येथे श्री. विजय बेदमुथ्था यांच्या घरी पोहचलो. त्यानंतर आम्ही सास्तूर येथे तंबू उभारून मदतकेंद्र सुरु केले. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना आठ दिवसांच्या कालावधीसाठी आळीपाळीने तेथे राहण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. जे कार्यकर्ते माझ्याबरोबर आले होते त्यांना कामाचे नियोजन देण्यात आले. सर्वात प्रथम खाण्यापिण्याची व्यवस्था, जनरेटर व्यवस्था व प्रेतं एकत्र करून सामूहिकरीत्या दहन करण्याची तयारी या तीन गोष्टीना प्राधान्य देण्यात आले. एकाच वेळी २०-२० प्रेतं जाळलेली आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटना, शासकीय अधिकारी, मिलिटरी, पोलीस यंत्रणा मदतकार्यासाठी तत्पर होते. तसेच अनेक लोक हा प्रलयंकारी भूकंपाची स्थिती पाहण्यासाठी या ठिकाणी भेट देत होते. काही लोक पर्यटन स्थळाला भेट दिल्यासारखे हा भूकंप पाहायला येत होते.

आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांची कार्यतत्परता :

तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. शरदचंद्र पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून लगेच भूकंपग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी त्यांचे मंत्रालयच सोलापूर येथे शिफ्ट केले व सर्व यंत्रणा सोलापूर येथून हलविली. पवारसाहेब सतत दौरे करून गावातील लोकांच्या अडचणी समजून घेत होते. अनेक निर्णय जागच्या जागी घेऊन ते लोकांना मदत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. असंख्य स्वयंसेवी संस्थाना त्यांनी यात सहभागी करून घेतले. एकीकडून मदत कार्य सुरु असतानाच दुसरीकडे पुनर्वसन कार्यासाठी वेगवेगळ्या घरकुल योजनांची प्रदर्शनीच भरविली होती. प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला त्यांच्या क्षमतेनुसार गावांचे वाटप केले होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी योग्य प्रमाणात मदत पोहचत होती. त्यांच्या या कार्यामुळे पुढील काळात मा. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना National Disaster Management Authority ची स्थापना करून कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.

बीजेएसचे उस्मानाबाद येथील केंद्र

बीजेएसचे उस्मानाबाद येथील त्यावेळचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय बेदमुथ्था यांचे निवासस्थान हेच त्यावेळी बीजेएसचे मदतकेंद्र बनले. पूर्ण महाराष्ट्रातून रोज ७०-१०० कार्यकर्ते येथे येऊन रिपोर्ट करून पुढे जात होते. सर्व कारभार येथूनच चालत असे. त्यावेळी मी सास्तूर येथे गाडीतच झोपत असे व सकाळी जवळच्या विहिरीवर अंघोळ करून पुढील कामाला लागत असे. २-३ दिवसांनी उस्मानाबाद येथे जाऊन श्री. बेदमुथ्था यांचे घरी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना रिपोर्टिंग करीत असे. त्यावेळी त्यांच्या घराला एका छावणीचे रूप प्राप्त झाले होते. रोज शेकडो कार्यकर्त्यांचा भोजनाचा स्वयंपाक श्री बेदमुथ्था यांच्या परिवारातील महिला वर्गच करीत होत्या व सर्व पुरुष इतर व्यवस्थेमध्ये मग्न होते. त्यांच्या संपूर्ण परिवाराने मोठ्याप्रमाणावर परिश्रम घेऊन या संकटकाळी आपले मोलाचे योगदान दिले, हे मी कधीच विसरू शकणार नाही.

मा. पंतप्रधान व विरोधीपक्ष नेते यांची बीजेएस मदत केंद्राला भेट :

त्यावेळी मा. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते व मा. अटलबिहारी वाजपेयी विरोधीपक्ष नेते होते. भूकंपानंतर ४-५ दिवसांनी त्यांनी या भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांना कोणत्याही गावात जाऊन भाषण करण्यासाठी सुविधा नव्हती. त्यांनी बीजेएसच्या सास्तूर येथील मदतकेंद्राला भेट दिली व या ठिकाणी जनरेटर व माईकची व्यवस्था असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला संबोधित केले व धीर दिला. यावेळी मा. नरसिंहराव व मा. वाजपेयी यांनी बीजेएसमार्फत सुरु असलेल्या मदतकार्याची माहिती घेतली. यावेळचा एक प्रसंग आठवतो. अमेरिकेचे भारतामध्ये असणारे राजदूत यांनी त्यांच्या दौऱ्यात बीजेएसच्या सास्तूर येथील मदत केंद्राला भेट दिली व तेथे जेवणही केले. वास्तविक पाहता अमेरिकन लोक बाहेर काही खात नाही व अशा ठिकाणी तर काहीच घेत नाहीत. त्यांनी लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जैन संघटनेने दिलेल्या जेवणाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट असल्याचा उल्लेख केला. त्यावेळचे देशातील जेष्ठ नेते मा. जॉर्ज फर्नांडिस यांनी बीजेएसच्या मदतकेंद्रावर जेवण घेतल्यानंतर ‘अशी डाळ पार्लमेंटमध्ये असणे जरुरी आहे’ अशी इच्छा वर्तमानपत्रामार्फत व्यक्त केली, हेही मला अजून आठवते. मा. सोनिया गांधी यांनीही बीजेएसच्या मदत केंद्राला भेट दिली.

संपूर्ण भारतातून मदतीचा ओघ :

कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यातील जैन समाजाचे लोक मदतीसाठी ट्रकमध्ये भरून साहित्य आणत होते. या सर्व साहित्याचे वाटप करण्यासाठी बीजेएसकडे सुविधा असल्यामुळे बीजेएसला मोठ्याप्रमाणावर कार्य करता आले. जेवणाबरोबरच वैद्यकीय मदतकेंद्र बीजेएसच्या वतीने सुरु करण्यात आले होते. श्री. राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद येथून मोठ्याप्रमाणावर जेवणाची तयार पाकिटे पाठविली व ती बीजेएसने या भागात वितरीत केली. हे सर्व कार्य करण्यात रात्रीचा दिवस करून मला जो काही अनुभव घेता आला तो माझ्या दृष्टिने माझ्या संपूर्ण आयुष्यातला Turning Point ठरला असे मला वाटते. त्यामुळेच हा भूकंप मी कधीच विसरू शकत नाही.

लहान मुलांच्यावर झालेल्या मानसिक आघाताची चाहूल :

सुरुवातीचे २-३ दिवस जेवण, कपडे, साहित्यवाटप सुरु होते. या व्यतिरिक्त आपण आणखी काही करू शकतो का या दृष्टिने मी त्या भागाचे व तेथील लोकांचे बारकाईने निरीक्षण करू लागलो. त्यावेळी बीजेएसच्या मदतकेंद्रावर जेवण घेण्यासाठी व मदतीचे साहित्य घेण्यासाठी ज्या रांगा लागत होत्या त्यामध्ये लहान मुलांची संख्या मोठ्याप्रमाणावर असायची. मी त्यांच्याशी बोलत असताना कोणाची आई वारली, कोणाचे वडील, कोणाचे काका, कोणाचे मामा हे त्या मुलांच्या तोंडून ऐकत होतो. या सर्व गोष्टींचा त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल याची मला चिंता वाटू लागली. रात्रंदिवस मातीचे ढीग पाहणे, प्रेतं इकडून तिकडे उचलताना पाहणे, आर्मीचे लोक युद्धाप्रमाणे काम करताना पाहणे, सगळीकडे पोलीस, डॉक्टर्स, अम्ब्युलंस, वाहने हे सर्व पाहून या कोवळ्या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल याची कल्पना करवत नव्हती. कारण या ५५ गावांतील सर्व शाळा भूकंपामुळे उध्वस्त झाल्या होत्या.

नवीन शाळा बांधण्यासाठी भरपूर कालवधी लागणार होता. या मुलांना शाळेत न जाता मदतीसाठी येणाऱ्या ट्रकच्या मागे उभे राहून मदत मिळविण्यासाठी धडपड करावी लागत होती. भूकंपामुळे एक पिढी उध्वस्त झाली आहे व आता शाळा बंद असल्यामुळे पुढची पिढीही बरबाद होईल याची भीती वाटू लागली. या सर्व गोष्टींचा मी विचार करू लागलो. कार्यकर्त्यांना इतर मदतकार्यासाठी लावता-लावता या मुलांच्या गहन चिंतेत मी बुडून जात होतो. माझ्या मनात असा विचार आला की या मुलांना या संकटातून बाहेर काढणे हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे कार्य असेल. मग ते कसे होऊ शकेल, याचा विचार मी करू लागलो. या मुलांना पुणे येथे घेऊन जाऊन त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा विचार माझ्या मनात आला. मनात फक्त विचार येऊन चालत नाही तर त्यासाठी कृती करावी व कृती करताना सद्य परिस्थितीचा विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना कसं घेऊन जायचं व कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाला.

भूकंपग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण :

भूकंपग्रस्त भागातील पूर्णपणे घरे उध्वस्त झालेल्या परिवारातील मुलांची यादी तयार करण्यासाठी ५५ गावांचा दौरा कार्यकर्त्यांच्या माध्यमाने करण्यात आला. त्यामधून भूकंपाने बेघर व अनाथ झालेल्या १२०० मुलांच्या नावाची पुस्तिका तयार करण्यात आली. ही पुस्तिका मा. मुख्यमंत्री साहेबांना परवानगीसाठी देण्यात आली. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले व भूकंपामुळे उद्भवलेली परिस्थिती किती भयानक आहे याची जाणीव आम्हाला त्याच वेळी झाली. त्यामुळेच या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा निर्णय हा पक्का झाला.

शैक्षणिक पुनर्वसणासाठी पुण्यातील तयारी :

त्यावेळी बीजेएसचे अखिल ‘महाराष्ट्रीय जैन संघटना’ असे नाव होते; परंतु संस्थेचे रजिस्ट्रेशन झालेले नव्हते. संस्थेकडे शाळा नव्हती. कॉलेज नव्हते, वसतिगृह नव्हते. जरी माझ्याकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसली तरी माझ्याकडे आत्मविश्वास होता. कोणत्याही प्रकारची व्यवस्था व तयारी नसताना एकदम १२०० मुलांना पुण्याला घेऊन जाण्याचा निर्णय घेणे हा एक वेडेपणाच होता.

मुलांना शैक्षणिक पुनर्वसनासाठी घेऊन जाण्याचा धाडसी निर्णय :

त्यावेळी माझे वय ४० वर्षांचे असेल. रोजची ही परिस्थिती पाहून मी निर्धार केला, या विद्यार्थ्यांना पुणे येथे घेऊन जाऊन त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन आपल्याकडे काही नसले तरी आपण हे काम करायचे. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील तो सर्वात धाडसी व मोठा निर्णय होता हे मी आजही नमूद करू इच्छितो. मी पवारसाहेबांशी बोलताना या मुलांना पुण्याला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी याबाबत मला अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझे नकरात्मक उत्तर होते. जागा नाही, इमारत नाही, परवानगी नाही, माझ्याकडे होती फक्त इच्छाशक्ती. याबाबत पवारसाहेबांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असता त्यांनीही या संकल्पनेस खूप मोठी जोखीम आहे म्हणून विरोध दर्शविला. यामधील काही मुलं पळून गेली तर ती खूप मोठी जबाबदारी राहील. त्यामुळे यासाठी परवानगी देऊ नये अशी शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. पवारसाहेबांनी मला हे सांगितल्यावर मी त्यांना म्हणालो १२०० पैकी १००-२०० मुलं पळून जातील, म्हणून १००० मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. मी पवारसाहेबांना सांगितले की, तेथील लोकप्रतिनिधींना विचारून यावर निर्णय घ्यावा. तेथील सर्व लोकप्रतिनिधींची इच्छा होती की या मुलांचे या ठिकाणी राहून खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे त्यांना पुणे येथे पाठविणे योग्य राहील. त्यानंतर या मुलांना पुण्याला पाठविण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पवारसाहेबांनी बालमानस तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, सकाळचे संपादक श्री. विजय कुवळेकर, श्री. पू. ग. वैद्य व इतर अशा ५-६ व्यक्तींची समिती नेमली. मी या समितीसमोर माझे प्रेझेंटेशन दिले. पवार साहेबांनी धाडसी निर्णय घेऊन त्यास मान्यता दिली.

मुलांचे पुण्याकडे प्रस्थान :

भूकंपानंतर २१ व्या दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी या १२०० विद्यार्थ्यांना तत्कालीन राज्यपाल श्री. पी. सी. अलेक्झांडर व पवार साहेब यांनी २८ एस.टी. बसेसला हिरवा झेंडा दाखवून सास्तूर येथून पुण्याला रवाना केले. त्यावेळी या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आलेले त्यांचे नातवाईक ढसाढसा रडत होते. ही दृश्ये मन हेलावणारी होती व त्याचबरोबर ती माझ्या मनात नवीन उर्जा निर्माण करणारी होती. त्याच उर्जेच्या जोरावर मी गेली २५ वर्षे कार्य करीत आहे.

पुणे येथील आगमनानंतर विद्यार्थांच्या वास्तव्यासंदार्भातील नियोजन :

लातूरहून निघाल्यानंतर पवार साहेबांच्या आग्रहामुळे बारामतीमध्ये सर्व मुलांची रात्रीच्या जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली व तेथून दुसऱ्या दिवशी या मुलांना पुण्याला रवाना करण्यात आले. माझ्याकडे या मुलांसाठी जागा नव्हती. त्यावेळी माझी पिंपरी येथील आत्मनगर येथे गृहयोजना पूर्ण होत आली होती. त्यामध्ये काही दुकाने व सदनिका तयार झाल्या होत्या परंतु त्याचा ताबा मी दिलेला नव्हता. मी काही दिवसांसाठी या विद्यार्थांची व्यवस्था या इमारतीमध्ये केली. मुलं पुण्यात आल्यावर पहिले काही महिने खूप त्रासदायक गेले. ७-८ मजली इमारती पाहून ही मुलं रात्री खाली उतरून तळमजल्यावर येत. कारण त्यांना वाटत होतं की आता जर परत भूकंप झाला तर ही इमारत पडेल व आपणही त्याखाली दबले जाऊ अशी भीती त्यांना वाटत होती. त्यावेळी संत तुकारामनगर, पिंपरी येथे महानगरपालिकेची एक शाळेची इमारत बांधून तयार होती. ही इमारत बीजेएसला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना या इमारतीत शिफ्ट करण्यात आले व शाळेला परवानगी घेण्यात आली. राज्य शासनाने खास बाब म्हणून या शाळेस परवानगी दिली.

मुलांबरोबर आलेले कार्यकर्ते पुण्यातच रमले :

लातूरहून येताना बसमध्ये या विद्यार्थ्यांबरोबर १५-२० B. A., B. Com. झालेले तेथील युवकही पुण्याला आले. मी या सर्व युवकांना पुणे येथे राहण्याची विनंती केली व त्यांना या प्रकल्पात नोकरी दिली. त्यांनीही नोकरी करीत करीत D.Ed., B.Ed. पूर्ण केले व नंतर त्यांची शिक्षक व इतर पदावर नेमणूक करण्यात आली. मला सांगण्यास आनंद होत आहे की हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील अनेक लोकांनी यासाठी मोठ्याप्रमाणावर सहकार्य केले. पहिले काही महिने ४०-५० विद्यार्थी वसतिगृहातून पळू जायचे. त्यांचा शोध घेणे खूप जिकीरीचे काम होते. काही मुलांचा तपास ७-८ दिवस लागत नव्हता. ही खूप मोठी रिस्क बीजेएस आपल्या अंगावर घेऊन पुढे मार्गक्रमण करीत होती. माझा विश्वास होता, नियत साफ होती. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग निघत होता. ही प्रक्रिया वर्षभर सतत चालू होती.

वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाची निर्मिती :

पुण्यात प्रकल्प सुरु झाल्यावर २-३ महिन्यांतच शैक्षणिक पुनर्वसन केंद्र उभे करण्याचा निर्णय मी घेतला. त्यासाठी वाघोली येथे पुणे-नगर रोडवर १० एकर जमीन मी स्वतःच्या पैशाने विकत घेतली. त्या ठिकाणी १००० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शाळा, कॉलेज असे सर्व सोयीयुक्त असा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला व त्याचा आराखडा तयार केला. माझा बांधकामाचा व्यवसाय असल्यामुळे त्याचे प्रेझेंटेशन मी तयार केले. त्यावेळी जागतिक बँक महाराष्ट्रामध्ये मोठ्याप्रमाणावर काम करीत होती. त्यांना हे प्रेझेंटेशन दिले व हा प्रकल्प बांधून द्यावा अशी विनंती केली. जागतिक बँकेने राज्य सरकारकडून अहवाल मागवला व या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि राज्य शासनाच्या माध्यमाने बोलता-बोलता तीन वर्षात बीजेएसचा वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प उभा राहिला. त्या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना शिफ्ट करण्यात आले. जसेजसे या भूकंपातील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडू लागले तसतसे मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी, जम्मू-काश्मीर भूकंपातील विद्यार्थी, जबलपूर भूकंपातील विद्यार्थी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं-मुली आजही या केंद्रामध्ये शिक्षण घेत आहेत.

भूकंपानंतर पहिली तीन वर्षे या विद्यार्थ्यांचा १० वीचा निकाल ४० टक्केच्या आताच लागत होता. जसे मी या विद्यार्थ्यांवर जास्त लक्ष केंद्रित करून काम करण्यास सुरुवात केली तसे ५-६ वर्षानंतर आजपर्यंत या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा निकाल ९५ ते १०० टक्के लागत आहे. एकीकडून शैक्षणिक प्रगती करीत असताना दुसरीकडून खेळाच्या माध्यमाने या विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला व हेच विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवर चमकू लागले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन :

लातूर-उस्मानाबाद भूकंपामुळे सुरु झालेल्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाचा उपयोग आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी होत आहे. जसजसा महाराष्ट्रामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे, तसतसा त्यांच्या मुला-मुलींचा शैक्षणिक पुनर्वसनाचा प्रश्न समोर येऊ लागला. हा प्रश्न अतिशय चिंताजनक व गहन आहे. शैक्षणिक पुनर्वसन म्हणजे फक्त त्यांच्या शिक्षणाचा खर्च करणे नव्हे, तर त्या विद्यार्थ्यांना आपत्तीमधून बाहेर काढून त्यांना सुशिक्षित व सुसंकृत बनविणे होय. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न खूप किचकट व अवघड आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा आत्महत्या करण्याची इच्छा निर्माण होते व त्यातील १\३ मुलांमध्ये आत्महत्या करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. २०१५ मध्ये या प्रकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय बीजेएसने घेतला. यासाठी मुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस मोठ्याप्रमाणावर प्रोत्साहन दिले व सहकार्य केले. सुरवातील फक्त १५० विद्यार्थ्यांना या प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. सध्या या प्रकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे व आदिवासी परिसरातील एकूण ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी मा. मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी सौ. अमृताजी फडणवीस या विद्यार्थ्यांना मुंबई येथे दोन दिवसांसाठी बोलावतात, त्यांची विचारपूस करतात. २१ जून हा योगदिन त्या या विद्यार्थ्यांच्याबरोबर साजरा करतात व दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करतात. एकदा त्यांनी वर्षा बंगल्यावर या सर्व विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्थाही केली होती. तीन वर्षापूर्वी या प्रकल्पात मेंटल हेल्थ विभागाची स्थापन करण्यात आली असून तज्ञ डॉक्टर्स व मानसतज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात संशोधन करून त्याचे डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. भविष्यकाळात हा प्रकल्प खूप महत्वाचा ठरणार आहे. याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे आभार.

लातूर-उस्मानाबादच्या या विद्यार्थ्यांचे बीजेएसच्या प्रत्येक आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे योगदान :

१९९७ चा जबलपूर भूकंप, २००१ चा गुजरातचा लातूरपेक्षा महाभयंकर भूकंप, २००५ चा तामिळनाडू व अंदमान-निकोबार येथील त्सुनामी, २००५ चा महापूर, जम्मू-काश्मीरचा भूकंप, बिहारचा पूर, अकोला पूर, नेपाळमधील भूकंप या सर्वच नैसर्गिक आपत्तीमध्ये याच लातूर-उस्मानाबादच्या विद्यार्थ्यांनी जाऊन मोठ्याप्रमाणावर मदतकार्य केले व देशापुढे एक वेगळे उदाहरण स्थापित केले. एका नैसर्गिक आपत्तीमध्ये होरपळलेल्या विद्यार्थ्यांनी, अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे करून एक मिसाल देशापुढे ठेवली. या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कुणी १२ वीपर्यंत, पदवीपर्यंत तर कुणी पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही विद्यार्थ्यांनी पुणे येथे राहून आणखी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. काही डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर तर काही उद्योजक झाले. काही विद्यार्थी गावाकडे जाऊन शेती करू लागले, काही शिक्षक झाले व नोकरीला लागले. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे आपल्या दिशा निवडल्या, आपापल्या क्षेत्रात चांगले काम केले.

बीजेएस माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना :

२०१३ साली भूकंपाला जेव्हा २० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा हे सर्व माजी विद्यार्थी पुणे येथे मला भेटण्यासाठी आले व म्हणाले, आम्हाला बीजेएसची माजी विद्यार्थी संघटना स्थापन करावयाची आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावेळी ३० सप्टेंबर रोजी वाघोली येथे मोठा कार्यक्रम घेण्यात आला व त्यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. याच भूकंपाच्या वेळी या विद्यार्थ्यांबरोबर आलेले श्री. अशोक पवार, वाघोली प्रकल्पात शिक्षक झाले, मुख्याध्यापक झाले. त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांच्याच पुढाकाराने माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली व गेली पाच वर्षे ही माजी विद्यार्थी संघटना चांगल्याप्रकारे कार्य करीत आहे. दोन वर्षांपूर्वी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत या माजी विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या परिवारांच्या वतीने औसा येथे ५००० लोक एकत्र येऊन महाश्रमदान करून खूप मोठी सामाजिक बांधिलकी जपली. त्या दिवशी दिवसभर मी औसा येथे या विद्यार्थ्यांबरोबर होतो. मला आज या गोष्टीचा आनंद आहे की, यापैकी काही विद्यार्थी रोज कोट्यावधीची उलाढाल करीत आहेत, काही विद्यापीठामध्ये ५०-५० शोधनिबंध लिहित आहेत, कोणी PI बनले आहेत, काही राजकारणात नाव कमवित आहेत, काही विद्यार्थी पुण्यामध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करीत आहेत, काही गावाकडे शेती करीत आहेत. त्यातील एक अमर बिराजदार याने आपले शिक्षण पूर्ण केल्यावर, भूकंपग्रस्तांसाठी शासनाने जे जे निर्णय त्यावेळी घेतले, GR काढले, GR वेळोवेळी बदल केले, त्याचा पाठपुरावा केला व या भूकंपग्रस्त भागातील अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्या.

या विद्यार्थ्यांची सद्यस्थिती :

अनेक वेळा मी जेव्हा महाराष्ट्रात दौरे करतो, तेव्हा अचानक एखादी व्यक्ती येऊन माझ्या पाया पडते. माझ्या लक्षातही येत नाही की ही व्यक्ती कोण आहे. त्यावेळेस ते सांगतात की, भाऊ आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत. तुमच्यामुळेच आम्हाला प्रगती करता आली. हे सांगताना त्यांचे डोळे भरून येतात. अशा वेळी माझे स्वतःचे मन भरून येते व आपण आणखी जास्त सामाजिक कार्य केले पाहिजे असे वाटते. हे कार्य करण्याची उर्जा त्यांच्याकडून मला सतत मिळत राहते.

कोण किती मोठं झालं, कोण शहरात राहते, कोण खेड्यात राहते हे महत्वाचे नाही. बीजेएसच्या वसतिगृहात शिक्षण घेतलेली मुलं इमानदार व सचोटीने काम करणारी असल्यामुळे त्यांच्या यशस्वी जीवनाचे गमक यातच लपलेले आहे असे मला वाटते. आज २५ वर्षांनंतर अनेक माजी विद्यार्थ्यांच्या नुकत्याच शुटींग केलेल्या चित्रफिती मी पहिल्या. मन भरून आले. अनेक मुलांनी लेखी स्वरुपात आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्याही खूप बोलक्या आहेत. त्यामुळे मी खूप नशीबवान आहे व स्वतःला भाग्यशाली समजतो. आज मी महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान राबवीत आहे व पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मला १०० टक्के खात्री आहे हे कार्य मी निश्चितपणे पूर्ण करू शकेल. या सर्वांच्या सहकार्याने अल्पावधीतच मी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू शकेल याची मला खात्री आहे.

या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व बंधू-भगिनींना २५ वर्षांनंतर बीजेएसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो.

या विद्यार्थ्यांची सद्यस्थिती :

img

भारतीय जैन संघटनेचा लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार :

लातूर-उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार भारतीय जैन संघटना व राज्य शासनाने केला आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी लातूर भूकंपाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून या निर्धार कार्यक्रमाचा शुभारंभ याच दिवशी हुतात्मा स्मारक मैदान, किल्लारी जिल्हा लातूर येथे दुपारी १.०० वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते, जेष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रिय मंत्री व जेष्ठ नेते मा. श्री. शिवराजजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून विशेष अतिथी म्हणून या दोन्ही जिल्ह्यातील आमदार, माजी मंत्री, खासदार व पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.